ओळख सातवाहनांची :
या पोस्ट मध्ये आपण सातवाहन राजांची सुरुवात कधी झाली हे माहिती करून घेऊया आणि त्यांची वंशावळ बघू. म्हणजे भारताच्या इतिहासात दीर्घ काळ शासन केलेल्या राजांपैकी सातवाहन हे मोजक्या राजांपैकी एक होते आणि किंबहुना सर्वात दीर्घ काळ राज्य केलेला वंश म्हणूनही सातवाहनांचा उल्लेख करता येईल.
सातवाहन हे भारतातले एक असे राजघराणे होते ज्याची स्थापना, राज्यनिर्मिती आणि राज्यविस्तार महाराष्ट्रात झाला. पण या घराण्याचा अंत आंध्र प्रदेशात झाला. त्यामुळे जे पुराणग्रंथ आणि तत्सम साहित्य उपलब्ध आहे त्यावर आधारित काही व्याख्यांनुसार आंध्र जनजाति काथा आणि 'दक्षिणपथ' अर्थात दक्षिणी क्षेत्रामध्ये साम्राज्याची स्थापना करणारा हा प्रथम दख्खनी वंश होता असेही उल्लेख आढळतात. या वंशाची सुरुवात 'सिमुक' उर्फ 'सिभुक' किंवा 'सिंधुक' नामक व्यक्तिने दक्षिणेतील कृष्णा आणि गोदावरी नद्यांच्या खोऱ्यात केली. या वंशाला 'आंध्र राजवंश' सुद्धा नाव दिले जाते. याचे प्रमुख कारण या घराण्याचा शेवट झाला तेव्हा त्यांची राजधानी आंध्र प्रदेशात होती.
सातवाहन राजांत सर्वात पराक्रमी राजा म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णी
हे त्याचे नाणे :
या गौतमीपुत्राने कनिष्काचा महाक्षत्रप असलेल्या (*१) नहपान या राजाचा पूर्ण पराभव करून त्याच्या वंशाचा नाश केला आणि महाराष्ट्राला शकांच्या जाचातून मुक्त केले. याच कारणामुळे गौतमीपुत्राला शकारि या नावानेही ओळखले जाते.
नाशिक जवळ गोवर्धन पर्वताच्या एका घळई मध्ये गौतमीपुत्र सातकर्णीने क्षत्रप नहपानाची कोंडी करून त्याचा आणि त्याच्या सैन्याचा पूर्ण नायनाट केला.
यालाच गनिमी काव्याची पहिली सुरुवात देखील म्हणता येईल ज्या युद्ध कलेचे प्रदर्शन करून आधी छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या नंतर मराठ्यांनी मोगल सैन्याला सळो की पळो करून सोडले होते.
तर या युद्धाने सातकर्णीच्या विजयाची गाथा खूप मोठ्या परिसरात पसरली. आणि नहपानाच्या पारिपत्याने गौतमीपुत्राचे राज्य देखील मोठे झाले.
नाशिकच्या जवळ गौतमीपुत्राने युद्ध जिंकले असले तरी सातवाहनांचा उगम गोदावरी - कृष्णा नदीच्या परिसरातीलच मानला जातो.
सिमुक उर्फ सिभुक उर्फ सिंधुक हा सातवाहन घराण्याचा ज्ञात असलेला संस्थापक राजा समजला जातो. इसवीसनाच्या २४० च्या आसपास समजला जातो.
अनेक अभ्यासक इसवीसनाच्या पूर्व ६० एवढ्या जवळ आणायचा प्रयत्न करतात पण तो फोल आहे. कारण इसवी सन पूर्व दुसऱ्या - तिसऱ्या शतकात निर्माण झालेली लेणी आणि त्यात असलेला अभिलेख यासाठी पुरावा म्हणून स्पष्ट काम करतात.
हे सर्व पाहण्या आधी आपण सातवाहन राजांची वंशावळ बघुयात म्हणजे अंदाज येईल की नेमके किती राजे या घराण्यात होऊन गेले.
सिमुक
│
└── कण्ह (कृष्ण)
│
└── सातकर्णी पहिला
│
├── राणी नागनिका
│
├── वेदिश्री
│
└── शक्तिश्री
│
└── पुढील सातवाहन वंश
│
└── हाल
│
└── गौतमीपुत्र सातकर्णी
│
└── वासिष्ठीपुत्र पुळुमावी
│
└── यज्ञश्री सातकर्णी
आता प्रत्येक राजाचा कालखंड देखील पाहुयात.
(इ.स.पू. २३० – इ.स. २२०)
| कालखंड | राजा |
|---|---|
| इ.स.पू. २३०–२०७ | सिमुक – सातवाहन वंशाचा संस्थापक |
| इ.स.पू. २०७–१८९ | कण्ह / कृष्ण / कन्ह |
| इ.स.पू. १८०–१७० | सातकर्णी पहिला |
| इ.स.पू. १७०–१५० | पूर्णोत्संग |
| इ.स.पू. १५०–१४० | स्कंधस्तंभि |
| इ.स.पू. १४०–१३० | सातकर्णी दुसरा |
| इ.स.पू. १३०–१२० | लंबोदर |
| इ.स.पू. १२०–११० | अपिलक |
| इ.स.पू. ११०–१०० | मेघस्वती |
| इ.स.पू. १००–९० | स्कंदस्वती |
| इ.स.पू. ९०–८० | मृगेन्द्र |
| इ.स.पू. ८०–७० | कुंतल सातकर्णी |
| इ.स.पू. ७०–६० | हाल |
| इ.स.पू. ६०–४० | मंडलक |
| इ.स.पू. ४०–२० | पुरिंद्रसेन |
| इ.स.पू. २० – इ.स. ५ | सुंदर सातकर्णी |
| इ.स. ५–२० | चकोर सातकर्णी |
| इ.स. २०–३५ | शिवस्वाती |
| इ.स. १०६–१३० | गौतमीपुत्र सातकर्णी |
| इ.स. १३०–१६० | वासिष्ठीपुत्र पुळुमावी |
| इ.स. १६०–१७० | शिवश्री पुळुमावी |
| इ.स. १७०–१७८ | शिवस्कंद सातकर्णी |
| इ.स. १७८–२०० | यज्ञश्री सातकर्णी |
| इ.स. २००–२०८ | विजय |
| इ.स. २०८–२१५ | चंद्रश्री |
| इ.स. २१५–२२० | पुळुमावी चौथा |
ही आहे सातवाहन घराण्याबद्दल आणि राजांबद्दल सर्वसाधारण प्रचलित माहिती.
पुढे आपण प्रत्येक माहितीची उपलब्ध पुरातत्वीय पुरावे आणि प्राचीन ग्रंथ, अभिलेख आणि नाणी यातून उपलब्ध असलेली माहिती या सर्वांच्या साहाय्याने सातवाहन साम्राज्याच्या इतिहासाचा स्पष्ट दिसेल असा पट मांडणार आहोत.
तळटीप:
(*१). नहपान हा कनिष्काचा महा क्षत्रप असण्याची शक्यता इतिहासकार मान्य करतात याचे प्रमुख कारण म्हणजे नहपानाची सापडलेली चांदीची नाणी. याचा आढावा आपण पुढे घेऊच. तूर्तास नहपानाच्या नाण्यांची ही झलक. आणि काही कोरीव मुद्रा नहपानाची ओळख स्पष्ट करतात.



